मुंबई : नाशिक ते मुंबई सत्ताधाऱ्यांनी मनसेची विकासाची कामं ढापण्याचा सपाटा लावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष कामाला लागले असताना ५ वर्ष राजीनामा नाट्यात व्यस्त असणाऱ्या शिवसेनेने आता इतरांची कामं स्वतःच्या नावावर दाखवून सामान्यांना टोप्या लावण्याचे उद्योग सुरु केले आहेत. विशेष, म्हणजे ज्या विकासाच्या कामाशी काहीही संबंध नसताना न केलेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेना घेत असून दादरकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.

सदर प्रकार आहे मुंबईतल्या दादर शिवाजीपार्क येथील विकासकामांचा आणि श्रेय घेणारा पक्ष आहे शिवसेना तर काम केलेला पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने. त्यात भर म्हणजे मनसेने दादरमध्ये केलेल्या कामाला त्यावेळी महापौर बंगल्याचा नियमांच्या आडून विरोध करणाऱ्या शिवसेनेने आता त्याच कामाचं भूमिपूजन करण्याचा घाट निवडणुकीच्या तोंडावर घातला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या कामाचं भूमिपूजन केलं आहे. या प्रकारावरून शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दादरमध्ये एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.

नोव्हेंबर २०१२ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाचं काम सुरू झालं. मनसेचे तत्कालीन स्थानिक आमदार नितीन सरदेसाई यांनी तेव्हा विधानसभेत प्रश्न व सूचना, मंत्रालयातील संबंधित खात्याच्या बैठक तसेच सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने दादर चौपाटीच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. त्या प्रकल्पानुसार पहिल्या टप्यात समुद्र किनारी संरक्षक भिंत, पदपथ मार्गिका तसेच दुसऱ्या टप्यात नवीन तंत्रज्ञान वापरून सागरी किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी योजना कार्यान्वित होणार होती.

भूमिपूजन होऊन येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. त्यानुसार नियोजित योजनेनुसार २०१४ मध्ये चौपाटीच्या सुशोभिकरणाचे काम देखील पूर्ण झालं. परंतु त्यावेळी शिवसेनेने या बंधाऱ्यावरील सुशोभित पदपथाच्या वापरास महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचं कारण देऊन तीव्र विरोध करून अडथळे केले. तसेच पालिकेतील सत्तेचा गैरवापर करून त्या जागेला कुंपण देखील घातले. ज्यामुळे काम पूर्ण होऊन सुद्धा दादरकरांना या पदपथाचा वापर करता येत नव्हता. परंतु, बुधवारी अचानक ५ वर्षांनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी या कामाच्या सुशोभिकरणाचं भूमिपूजन जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेने ‘ढापून दाखवलं’ ही आपली महापालिकेतील वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिली आहे.

२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचे सदा सरवणकर दादर-माहीमचे आमदार म्हणून तर राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आले. ‘मागील साडे चार वर्षात त्यांचे दादर चौपाटीकडे लक्ष नव्हते. परंतु अचानक बुधवारी दिनांक ६ मार्च २०१९ रोजी जो बंधारा २०१४ सालीच बांधून पूर्ण आहे, जिथे सुशोभित वॉक-वे आधीच तयार आहे, तिथे केवळ राजकीय लाभासाठी नव्याने भूमिपूजन केलं जात आहे’, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

Shivsena party to do inauguration of development work done by mns at Dadar shivaji park