ठाणे : शिवसेनेची सत्ता असलेली ठाणे महानगरपालिका सत्ता घोटाळ्याच्या गरत्यात अडकण्याची चर्चा रंगली आहे. त्यात काल म्हणजे शनिवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या चर्चेत आलेला हा प्रस्ताव अधिक वादाच्या भोवऱ्यात सापडत असताना सत्ताधारी शिवसेनेने गोंधळ घालून चर्चेशिवाय हा संपूर्ण प्रस्ताव मंजूर केल्याने घोटाळ्याचा संशय अधिक बळावला आहे असे वृत्त आहे.

तीन पार्क घोटाळे चव्हाट्यावर आल्यानंतर सुद्धा ठाण्यातील जनतेच्या पैशांची प्रचंड उधळपट्टी करण्याची चटक लागलेल्या ठाणे महानगर पालिकेने आता ठाणे परिवहन सेवेकडे अर्थात टीएमटी’कडे वक्रदुर्ष्टी केली आहे अशी चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे. ठाणे टीएमटीच्या नादुरुस्त असलेल्या तब्बल १५० बस दुरुस्त करून त्या जीसीसी म्हणजे ‘ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट’ तत्त्वावर ऑपरेट करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला ५ वर्षांत तब्बल ४५७ कोटी रुपये मोजण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या या आकड्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

टीएमटीच्या १९० बसेसच्या संचालनासाठी प्रति किलोमीटर ‘६६ रुपये एसी’ आणि ‘५३ रुपये नॉनएसी’ संबंधित कंत्राटदाराला मोजले जात असताना, आता नादुरुस्त असलेल्या तब्बल १५० बस दुरुस्त करून त्या जीसीसी तत्त्वावर चालविण्यासाठी अनुक्रमे ८६.२५ आणि ७७.५५ रुपये इतकी किंमत मोजण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. तर टीएमटी स्वतःच्या क्षमतेवर ज्या बस चालवत आहे, त्याचा प्रति किमी खर्च ११७ रुपये इतका असल्याचे दाखवून जीजीसी पद्धती फायद्याचीच आहे, असे आकड्यांचे खेळ पालिकेतील धुरंदरांनी केले आहेत. त्यामुळे ठाणे पालिका लवकरच नव्या गर्तेत अडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनएमएमटी आणि टीएमटीच्या बस या दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च सुद्धा वेगळा आहे. संबंधित प्रस्तावातील दर जास्त दिसत असले तरी स्पर्धात्मक निविदांमध्ये त्याचे निश्चितच कमी दर येतील आणि त्यामुळे पालिकेची वर्षाकाठी ३९ कोटींची बचत होणार आहे, अशी सावध प्रतिक्रिया टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Shivsena ruling thane municipal corporation under scanner of TMT bus scam