वैभववाडी : कोकणात सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र असून, त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः खासदार नारायण राणे यांनी पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने काल वैभववाडी येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोणत्याही सत्तेशिवाय मातोश्रीची चुल पेटणार नाही. त्यामुळे सत्तेला लाथ मारण्याची भाषा उद्धव ठाकरे करत असले तरी ते कधीही सत्ता लाथाडणार नाहीत हे वास्तव आहे. कारण मुळात सत्ता हाच सध्याच्या शिवसेनेचा प्राणवायू असल्याची खरमरीत टीका नारायण राणे यांनी केली आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, ‘मागील तब्बल ३९ वर्षे जीवाची पर्वा न करता बाळासाहेबांवरील निष्ठेपायी शिवसेनेत मी झगडत राहीलो. त्यावेळी मराठी माणसांसाठी शिवसेना होती असे सर्वांना भासविण्यात आले. पण मुळात महाराष्ट्रातील मराठी युवक आणि युवतींसाठी शिवसेनेने नेमकं काय केलं? असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. कारण, सध्याच्या शिवसेनेने केवळ धंदेवाईक राजकारण सुरु केले असून त्यात जिल्हाचा पालकमंत्री आणि शिवसेनेचे खासदार कुचकामी ठरल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
सत्तेत आल्यापासून मागील साडेचार वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हयासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने नेमकं काय काम केले? याचे उत्तर त्यांनी सामान्यांना द्यावे. केवळ मी स्वतः आणलेल्या प्रकल्पांचीच भूमीपूजन आणि वारेमाप घोषणा करण्यापलीकडे रोजगार आणि विकासाचा कोणताही प्रकल्प पालकमंत्री, खासदार आणि इथल्या कुडाळच्या आमदाराने आणलेला नाही, असं माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे म्हणाले.
त्यामुळेच केवळ जनतेच्या हिताचा विचार करुन स्वाभिमान पक्ष काढण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे जात-धर्म विसरुन ‘कोकणी माणूस’ म्हणून स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित कोकणी माणसाला केले.

Vaibhavwadi sabha..fakt Swabhiman!! pic.twitter.com/olgaypCiCZ
— nitesh rane (@NiteshNRane) November 12, 2018
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		