खेड : शिवस्मारक पायाभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेली स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला ३३ वर्षीय सिद्धेश पवारच वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. सिद्धेश मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे या गावातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, सिद्धेश पवार याचे मामा विक्रांत आंबरे सुद्धा त्याच्यासोबत बोटीवर उपस्थित होते, ते सुद्धा जखमी झाले आहेत. सिद्धेशच्या मामांवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरु आहेत.

संबंधित बोट उलटल्यानांतर २ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती होती, परंतु त्यातील एक जण रेस्क्यू टीमला सापडला होता पण सिद्धेशचा पत्ता लागत नव्हता. भारतीय नौदलाच्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान ४ तासांनी सिद्धेश पवारचा मृतदेह अपघातग्रस्त बोटीमध्येच सापडल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली तरी सरकारी यंत्रणेच्या बेजवाबदार पणामुळे आणि मेटेंनी हा कार्यक्रम घडून आणण्यापूर्वी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची कोणतीही जवाबदारी घेतली नव्हती त्यामुळेच हा प्रसंग ओढावल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

मृत्यूमुखी पडलेला सिद्धेश पवार हा मुंबईतील सांताक्रुझ मध्ये वास्तव्यास होता. सिद्धेश पवार हा व्यवसायाने सीए होता. त्याचे मामा विक्रांत आंबरे स्वतः शिवसंग्राम या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. आंबरे हे विनायक मेटे यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या सोबत सिद्धेश पवार या कार्यक्रमाला गेला होता. तसेच स्पीड बोट चालकाने अति वेगाने बोट चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा पुढे येत आहे. अपघात झाला त्या बोटीवर शिवसंग्रामचे तब्बल २५ कार्यकर्ते होते. वर्षभरापूर्वीच सिद्धेशचे लग्न झाले होते, त्याच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

Shivsmarak program siddhesh pawar dead body found