औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार असल्याचं जरी स्पष्ट करण्यात आलं असल तरी पोलिसांनी योग्य ती खबरदारी म्ह्णून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार गंभीर नसून ४ वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही अशी समाजाची तीव्र भावना झाली आहे.
या समाजाच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत त्याचा आढाव;
१. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर सरकार गंभीर नसून चार वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही.
२. ढासळत्या कृषी अर्थव्यवस्थेत होणारी घुसमट ओळखून त्यावर उपाययोजना कराव्यात.
३. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे मराठा युवकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढावा.
४. शिक्षण, रोजगार निर्मितीसाठी शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के सवलतीचा आदेश सरकारने काढला. पण महाविद्यालये हा आदेश मानत नसून यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृह उभारण्याच्या दिशेनेही पावले उचलण्यात आलेली नाही.
५ अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करुन वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. मराठा युवक तसेच युवतींना यापासून वंचित ठेवून सरकार काय साधू इच्छिते?.
६. शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यामुद्द्यांवर सरकार अपयशी ठरली आहे.
७. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे.
८. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे.
९. राज्य मागासवर्गीय आयोगाचे कामकाज जलदगतीने पूर्ण करावे.
१०. मराठा आरक्षणासाठी २९ युवकांनी बलिदान दिले असून त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरी द्यावी.
