
Post Office Interest Rate | नव्या वर्षात अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने खुशखबर दिली आहे. त्यानुसार सुकन्या योजना आणि पोस्ट ऑफिस एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दोन अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पबचत योजनांचे व्याजदर 10 ते 20 बेसिस पॉईंटपर्यंत वाढले आहेत.
ज्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे, त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना आणि 3 वर्षांच्या ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट स्कीमचा समावेश आहे. केंद्र सरकारने सुकन्यांच्या व्याजदरात 20 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे.
सुकन्या योजनेतील व्याजदर किती आहे?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारा व्याजदर 8 टक्के होता. पण त्यात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून, त्यानंतर व्याजदर 8.20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, सुकन्या समृद्धी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत पालक आपल्या मुलींसाठी दोन खाती उघडू शकतात. यामध्ये दरवर्षी किमान 250 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील कोणतेही मूल खाते उघडू शकते. या सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत उघडू शकता.
तीन वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीवरील व्याजदरात वाढ
पोस्ट ऑफिसमध्ये केलेल्या 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या मुदत ठेव योजनेवर तुम्हाला फक्त 7 टक्के व्याज दिले जात होते. परंतु सरकारने या योजनेवरील व्याजदरात 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून ७.१ टक्के करण्यात आले आहेत.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात तीन वर्षांहून अधिक काळ कोणतीही वाढ झालेली नाही. यामध्ये शेवटचा बदल एप्रिल ते जून 2020 या कालावधीत करण्यात आला होता. मात्र, सध्या सरकारकडून इतर अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
याशिवाय जानेवारी-मार्च तिमाहीतील 2024 सालच्या बचत ठेवींवर 4 टक्के व्याज मिळत आहे. तर एका वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 6.9 टक्क्यांपर्यंत व्याज दर दिसून आला. तर 2 वर्षांच्या पोस्ट ऑफिसडिपॉझिटवर 7 टक्के व्याज परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीवर 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तर 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.