पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्यसह इतर तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता आणि चंद्रकांत पाटील सुद्धा कोल्हापूरला राम राम करत पुण्यातील कोथरूड मतदारसंघावर डोळा ठेवून होते. मात्र चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि पुण्यातील ब्राह्मण समाजाने तीव्र विरोध दर्शवत सर्वत्र चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात प्रचार सुरु केला होता.
मेधा कुलकर्णी यांना संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आणि चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण समाजाने तीव्र विरोध सुरु ठेवत उमेदवार देखील रिंगणात उतरवले होते, मात्र नंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांच्याविरूद्ध स्थानिकांनी बॅनरबाजी सुरु केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना चंद्रकांत पाटलांनी पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप करत व्हिडिओ देखील व्हायरल केले होते.
निवडणुकीपूर्वीच चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजकारणातून संपण्याची वक्तव्य केली होती. त्यामुळे आघाडीतील पक्ष देखील आता चंद्रकांत पाटील यांना घेरण्याचा तयारीत होते. त्याचाच भाग म्हणजे आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता कोथरूड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्येच आता उभी फूट पडली आहे. महासंघाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आनंद दवे यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधून नवीन संघटनेची स्थापना केली आहे.
ब्राह्मण मतदारांची निर्णायक संख्या असलेल्या कोथरूड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा मराठा चेहरा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच महासंघामध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळाली होती. कोथरूडमध्ये ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी महासंघाची स्पष्ट मागणी होती. तसेच त्याला अनुसरून ‘दूरचा नको, घरचा उमेदवार हवा’ अशी पोस्टरबाजी मतदारसंघात करण्यात आली होती. परंतु, भारतीय जनता पक्षाने त्याकडं कानाडोळा केलं. त्यामुळं ब्राह्मण महासंघ अधिकच नाराज होता. त्यानंतर परशुराम सेवा संघ आणि ब्राह्मण महासंघानं इथं आपापले स्वतंत्र उमेदवार जाहीर केले होते.
परशुराम सेवा संघाच्या उमेदवारानं कालांतरानं माघार घेतली. कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात आली. त्या सक्रिय देखील झाल्या मात्र, ब्राह्मण समाजात धुसपूस वाढल्याच म्हटलं जातं आहे. अशातच दवे यांनी पाटील यांना परस्पर पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं संतापलेल्या महासंघाच्या राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी दवे यांची हकालपट्टी केली. आणि त्यानंतर दवे वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत होते.
अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. ‘ब्राह्मण महासंघ’ असं या संघटनेचं नाव असून दवे हे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ‘ब्राह्मण समाजाचे सध्याचे नेतृत्व विकले गेले आहे. समाज बांधव त्यांच्यावर नाराज आहेत. नव्या संघटनेच्या माध्यमातून सर्व जातीपातींना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं काम केलं जाईल,’ असं दवे यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर चंद्रकांत पाटील आले ब्राह्मण समाजातच फूट पाडून गेल्याची चर्चा रंगली आहे आणि त्याचे दुष्परिणाम चंद्रकांत पाटील यांना मतदानादिवशी भोगावे लागतील असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
