कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सोमवारपासून त्यांचा राज्यव्यापी दौऱ्यातील दुसरा टप्पा सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी आणि पक्षातील सर्वच थरातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत अशी माहिती रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्जत येथून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. १४ मे ते १७ मे या कालावधीत राज ठाकरे हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, माणगाव, पेण, पनवेल व उरण अशा एकूण ११ ठिकाणी त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समूजन घेणे तसेच स्थानिक लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार असल्याची माहिती रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिली.

त्यांच्या रायगड दौऱ्यातील विशेष मुद्दा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदा स्थानिक प्रश्न थेट लोकांकडून जाणून घेण्यासाठी सामाजिक संस्थांशी संपर्क साधणार आहेत. त्यानिमित्त राज ठाकरे पनवेलमध्ये १७ मे रोजी सकाळी ९ वाजता गार्डन हॉटेल येथे अनेक स्थानिक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यामध्ये पनवेल संघर्ष समिती, सिटिझन्स युनिटी फोरम, सामाजिक संस्थांची समन्वय समिती, जेष्ठ नागरिक संघ पनवेल यांच्यासह अन्य सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल.

स्थानिकांबरोबर संवाद साधण्याचा कार्यक्रम आटोपून ते पनवेल शहरातील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

MNS Chief Raj thackeray on raigad tour