ठाणे : मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.

दरम्यान कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे कामावर जाणा-या नागरिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी