मुंबई : राज्यात सध्या पावसाने परतीचा रस्ता घेतल्यानंतर ऑक्टोबर हिट’चा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. घराबाहेर पडताच मुंबईकर घामाघूम होतोय. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे.
अंगाची लाहीलाही होत असल्याने चाकरमानी गारेगार सरबतचा आस्वाद घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर वातावरणातील वाढत्या उकाड्याने त्रस्त झाला आहे. गॉगल घालून, स्कार्फ बांधून मुंबईकर घराबाहेर पडतोय. मुंबईत येत्या २४ तासात हवामान किंचित ढगाळ राहील. तर राज्यातील काही भागात किरकोळ पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण तसेच घाटमाथ्यासह विदर्भात या दरम्यान काही ठिकाणी पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्रात मात्र अजून कोरडे हवामान आहे. गुरुवारी सकाळपर्यंत सांताक्रूझ येथे कमाल ३२.८ अंश सेल्सिअस, किमान २५.५ अंश सेल्सिअस तर ८३ टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आहे. तर कुलाबा येथे कमाल ३२ अंश सेल्सिअस, किमान २६ अंश सेल्सिअस तर ९० टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे रोज घराबाहेर निघणारा सामान्य माणूस ऑक्टोबर हिट’मुळे पुरता होरपळून निघण्यास सुरुवात झाल्याने, जास्तीत जास्त पाणी पिण्याच्या सूचना आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
