वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बँंकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोडीस तीव्र विरोध दर्शविला असून, जगातील कोणत्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत आडकाठी आणण्याच्या हालचालींवर एएमएफ’ची नजर असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलं आहे. तसेच जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना एएमएफ’चा तीव्र विरोध असल्याचे सुद्धा म्हटले आहे. सध्या भारतात RBI आणि मोदी सरकारमध्ये वाद पेटल्याच्या विषयाला अनुसरून IMF ने मत व्यक्त केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली रिझर्व्ह बँकेवर जाहीर टीका करत आहेत. तसेच २००८ ते २०१४ या कालावधीत वारेमाप कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास RBI अपयशी ठरली असून, त्यामुळेच देशातील आजच NPA संकट निर्माण झाले आहे, असे अरुण जेटली यांनी म्हटले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड राजकीय दबाव असल्याच्या बातम्या सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय जगभर चर्चेला आला आहे.
दरम्यान, या विषयाला अनुसरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दळवळण संचालक गेरी राइस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही या स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. तसेच या पुढेसुद्धा आमची नजर राहीलच. IMF याबाबत भूमिका वारंवार स्पष्ट करत आलं आहे. त्यावर मी पुन्हा सांगू इच्छितो की, केंद्रीय बँक आणि वित्तीय देखरेख संस्थेच्या (RBI) स्वातंत्र्याबाबत तडजोड होईल, अशा पद्धतीचा हस्तक्षेप कोणत्याही सरकार अथवा उद्योगाकडून होता कामा नये. आणि हे IMF ने स्वीकारलेले सामान्य तत्त्व आहे. आणि हीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील रूढ पद्धत सुद्धा आहे. त्यामुळे केंद्रीय बँक आणि वित्तीय निगराणी संस्थेचे महत्त्व सर्वोच्च आहे. आणि हे सर्वच देशांच्या बाबतीत सर्वात महत्वाचं सत्य आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		