औरंगाबाद : राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि संपूर्ण ग्रामीण भाग त्यात संकटात सापडला आहे. त्यात मराठवाड्यात परिस्थिती अतिशय भीषण असून अनेक गावांमध्ये तब्बल १५ ते २० दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्याने अनेक दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. गावात पाण्याचा टँकर आला की, पाणी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते आणि त्यातून भांडणण आणि मारामाऱ्या होण्याइतपत परिस्थिती भयाण झाली आहे.
दुर्दैवाने तसाच काहीसा प्रकार काल रात्री फुलंब्री तालुक्यातील निमखेड जोशी वस्तीवर आलेल्या अशाच एका पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने गावात सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गावात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याचा टँकर आला होता. दरम्यान, त्या टॅंकरचा नळ बंद होता, परंतु टँकरमधून पाणी खाली गळत होते असं जमलेल्यांना दिसत होतं. दरम्यान, या महिलेने ते खाली गळणारे पाणी हंड्यात भरण्यास सुरुवात केली. परंतु, पाणी खाली गळत असल्याने जमिन थोडी भुसभुशीत झाल्याने त्यात टँकरचे चाक मातीत दबली गेली आणि त्यादरम्यान सदर महिला त्या चाकाखाली आली. भरलेल्या पाण्याचा एकूण लोड आणि त्यात टँकरचे वजन यामुळे क्षणात त्या महिलेच्या मृत्यू झाला. त्यामुळे दुष्काळाने परिस्थिती किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो आहे.
