कल्याण : भाजपच्या प्रत्येक सभा आणि सभेदरम्यान सहज नजरेस पडणारी महागड्या सभेची संसाधनं म्हणजे भव्य मंच, त्यामागील भव्य एलईडी डिस्प्ले, भव्य मैदान आणि अगदी आदेशाप्रमाणे करण्यात येणारे सभेचे थेट प्रक्षेपण हे डोळे दिपवून टाकणारं आहे. परंतु, त्यासाठी खर्ची करावा लागणारा प्रचंड पैसा विरोधकांच्या मनात वेगळीच शंका व्यक्त करत आहे. कारण, कोणत्याही केंद्रीय, राज्य, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये सत्तेत नसलेल्या दोन पक्षांकडे नेमका पैसा कुठून येतो आहे, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.
सध्या अशा प्रकारच्या सभा घ्यायच्या म्हटल्या की संबंधित पक्षाला प्रचंड पैसा खर्ची पाडावा लागतो. कारण, एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या सभा यापूर्वी सुद्धा अनेक वेळा झाल्या आहेत. परंतु, आगामी लोकसभा निवडणुका ज्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत, त्यात मतविभाजनाकडे अधिक लक्ष दिले गेले आहे. बहुजन वंचित आघाडीचा मतदार हा काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार असल्याने भाजपनेच या दोन पक्षांना आर्थिक बळ दिल्याची कुजबुज विरोधकांनी प्रसार माध्यमांकडे सुरु केली आहे.
त्यामुळे बहुजन वंचित आघाडीला राज्यात जास्तीत जास्त सभा आयोजित करण्यासाठी बळ देण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधकांच्या चर्चेनुसार बहुजन वंचित आघाडी सभांमधून भारतीय जनता पक्ष आणि मोदींना लक्ष करत असली, तरी तो त्यांच्याच रणनीतीचा भाग आहे असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारसंघात ओवेसी आणि प्रकाश आंबेडकरांच्या सभा आयोजित करून हिंदू मतदारांमध्ये भीती निर्माण करणे आणि बहुजन समाज व मुस्लिम समाज जो काँग्रेस राष्ट्रवादीचा मतदार आहे, त्यांना बहुजन वंचित आघाडीकडे आकर्षित करून विरोधकांची मतं फोडणं अशी रणनीती असल्याची विरोधकांची शंका धृढ होताना दिसत आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीकडे जितकी बहुजन समाजाची आणि मुस्लिम समाजाची मतं जातील, तितक्या भाजपच्या जागा वाढतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा घटतील असं काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांचं म्हणणं आहे.
