
PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजनेत तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने उघडू शकता आणि त्यावर कर्ज सुविधाही मिळवू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजना ही सरकारद्वारे सुरू केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेला आपण सेवानिवृत्ती बचत योजना असेही म्हणू शकतो. ही योजना भारत सरकारद्वारे सर्वांना सेवानिवृत्तीनंतरचे सुरक्षित आर्थिक जीवन प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.
एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून या योजनेचा लाभ घेता येतो. पीपीएफ योजनेच्या नियमांनुसार, योजना खाते 15 वर्षांनी परिपक्व होते. 15 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही या योजनेत पुढील 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता. या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रोख रकमेची कमतरता असल्यास, पीपीएफ खातेधारक आपल्या गुंतवणुकीवर कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
कर्ज सुविधा आणि लाभ :
PPF खातेधारक सदस्यत्वाच्या तिसऱ्या वर्षानंतर कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकतात. कर्ज घेण्याचा हा पर्याय फक्त सहाव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत उपलब्ध आहे. पूर्ण रकमेसाठी कर्ज घेता येत नाही. ज्या वर्षासाठी कर्जाची विनंती केली जात आहे त्या वर्षाच्या आधीच्या दोन वर्षांच्या शेवटी खात्यात उपलब्ध असलेल्या रकमेच्या कमाल 25 टक्के रक्कम कर्ज रूपाने घेतली जाऊ शकते. म्हणजेच, जर 2021-22 मध्ये कर्ज घेतले असेल, तर 31-03-2020 पर्यंतच्या गुंतवणूक रकमेच्या 25 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेता येईल.
PPF वर कर्जावरील व्याजदर :
PPF खात्यावरील मिळणाऱ्या कर्जावर आकारला जाणारा व्याजदर हा सध्याच्या सरकारने ठरवलेल्या व्याजदरापेक्षा 1 टक्के अधिक असतो. कर्जाची विनंती करण्यासाठी तुम्ही बँक शाखेला किंवा पोस्ट ऑफिस ला भेट देऊ शकता. सध्या व्याज दर हा 8.1 टक्केच्या जवळपास असेल. PPF योजनेत मिळणारा व्याज दर परतावा 7.1 टक्के असेल.
कर्जाची परतफेड मुदत :
कर्जाची मूळ रक्कम कर्ज मंजूर घेतल्यापासून 36 महिन्यांच्या आत परत फेडणे आवश्यक असते. तुम्ही कर्जाची परतफेड एकरकमी करू शकता किंवा दोन किंवा अधिक मासिक हप्त्यांमध्ये 36 महिन्यांच्या कालावधीच्या आता परत फेड करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.