नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या ८ माजी प्रमुखांनी राष्ट्रपतींना लेखी पत्र लिहून भारतीय लष्कराचा राजकीय वापर करण्यापासून समज द्यावी अशी विनंती केली आहे. तसेच भारतीय सैन्यदलाच्या कोणत्याही ऑपरेशनचा राजकीय फायदा घेऊ नये असे निर्देश राजकीय पक्षांना द्यावेत अशी विनंती त्या पत्रात करण्यात आल्याचे वृत्त आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडताच काही वेळाने ही माहिती बाहेर आली आहे.

द टेलिग्राफ ने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे, ‘महोदय! राजकीय नेते मंडळी सीमेपार करण्यात आलेल्या कारवाईचं श्रेय घेत आहेत नि त्यापुढे सुद्धा ते देशाच्या सेनेला ‘मोदींची सेना’ म्हणत आहेत, जे अतिशय धक्कादायक आणि स्वीकारणं शक्य नाही असं म्हटलं आहे. परंतु त्यात कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचं व नेत्याचं नाव घेण्यात आलेलं नाही. परंतु, सध्या लोकसभा अनुषंगाने सुरु असलेल्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि स्वतः नरेंद्र मोदीच त्याचा अधिक वापर करताना दिसत आहेत हे स्पष्ट आहे.

काही दिवसांपूर्वी अनेकांनी सैन्यदलाच्या राजकीय वापरावरून अशीच तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. बालाकोट एअर स्ट्राईक’नंतर नरेंद्र मोदी त्याच सैन्यदलाच्या कारवाईच्या आधारे स्वतःच्या पक्षासाठी जाहीरपणे मतं मागत आहेत. तसेच काही दिवसनपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर सभेत ये ‘मोदीजी की सेना है’ असे शब्दप्रयोग केल्याने खळबळ माजली होती.

राष्ट्रपतींना पत्र लिहिणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या या माजी प्रमुखांमध्ये जनरल एस.एफ. रॉड्रिग्स, जनरल शंकर रॉय चौधरी, जनरल दीपक कपूर, ऍडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ऍडमिरल विष्णू भागवत, ऍडमिरल अरुण प्रकाश, ऍडमिरल सुरेश मेहता, चीफ मार्शल एन.सी. सूरी यांचा समावेश असून त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सैन्यदलांना राजकरणापासून अलिप्त आणि सुरक्षित ठेवण्याची विनंती केली आहे.

ब्रेकिंग-न्यूज: सैन्याचा राजकीय वापर थांबवा, सैन्यदलाच्या ८ माजी प्रमुखाचं राष्ट्रपतींना पत्र