मुंबई : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली होती. यावर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी बोचरी टीका देखील केली. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचं एक झाड देखील दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांमध्ये मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवत भारतीय जनता पक्षाविरोधी जोरदार प्रचार केला होता. याविरोधात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अनेकवेळा कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेणारे आशिष शेलार यांनी कधी कृष्णकुंज निरखून पाहिले की नाही असंच म्हणावं लागेल. कारण राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजच्या आतल्या बाजूस असलेले वृक्ष देखील जसे च्या तसे आहेत आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे शेलारांची नेटिझन्स महाराष्ट्र सैनिकांनी चांगलीच खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळते.
