नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीवरुन देशभरातील विरोधक मोठ्या प्रमाणात त्यांची जोरदार खिल्ली उडवत आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं असून त्यांच्या विधानावरुन विरोधकांनी मोदींना थेट लक्ष्य करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘हल्ल्या आधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तद्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता’ अशाप्रकारचं विधान मोदींनी केलं आहे.

दरम्यान, मोदींचं ते विधान गुजरात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही ट्विट करण्यात आलं होतं. परंतु, समाज माध्यमांमध्ये जोरदार खिल्ली उडायला सुरूवात झाल्यानंतर ते ट्विट गुजरात भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवरुन डीलिट करण्यात आलं आहे.

मोदी नेमकं काय म्हणालेत या मुलाखतीत:

”मी ९ वाजता (हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत) माहिती घेतली. त्यानंतर १२ वाजता पुन्हा माहिती घेतली. त्यावेळेस वातावरण अचानक खराब झालं होतं आणि ती आमच्यासमोरील मोठी समस्या होती. खूप पाऊस झाला…मी हैराण झालो, आतापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात, त्यांचं डोकं येथे चालत नाही. १२ वाजता…मी पहिल्यांदाच हे सांगतोय…एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार…ढग जातील की नाही…त्यावेळी तद्ज्ञ देखील हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते…त्यावेळी माझ्या मनात २ विचार डोकावले…एक गोपनियता….आतापर्यंत सर्व गोपनिय होतं… गोपनियतेत जर काही चूक झाली तर आम्हीच काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही, पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.

फेकणाऱ्याने फेकत जावे अन ऐकणाऱ्याने ऐकत जावे! एअरस्ट्राइक’वरून मोदींची ढगाळ फेका फेकी?