मुंबई : इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर यावरून मोठं मोठे विनोद होण्यास सुरुवात झाली आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला अत्यंत मारक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान संबंधित बदल करताना इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा थेट आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण होईल, असा दावा देखील अनेकांनी केला आहे. मात्र बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा बदल नवीन नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.

मागीलवर्षी पहिलीपासूनच सुरूवात केली आहे. इंग्रजी व ४ दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील संख्या वाचन असे केले जाते. मात्र हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव प्रामाणिक उद्देश त्यामागे आहे. केवळ २१ ते ९९ पर्यंतच हा बदल असून इतर जोडाक्षरे बदलण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही, असेही नारळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

बदल पहिलीपासूनच, गणिताच्या पुस्तकामध्ये सोपे ते स्वीकारले