मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सादर केलेल्या २०१८-१९ च्या आर्थिक सर्वेक्षणातून त्यांच्यापुढे किती मोठे आव्हान उभे आहे त्याची स्पष्ट कल्पना सर्वांना आलीच असेल. दरम्यान सर्वेक्षणात जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे, चीन-अमेरिका व्यापार युद्धामुळे मंदी वाढण्याची शक्यता दाट झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढ देखील ७.२ टक्क्यावरून ६.८० टक्क्यांवर आली आहे, हे देखील आपल्याला मान्य केले आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सकल राष्ट्रीय उत्पन्न GDP १९० लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज वक्त करण्यात आला आहे आणि त्याच्या ३.४ टक्के वित्तीय तूट असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. सदर तुटीचे आव्हान तब्बल ६.४६ लाख कोटी इतके आहे. महसुली तूट २.३ टक्के म्हणजे ४.३७ लाख कोटी आहे. वित्तीय तूट ६.४६ लाख कोटीवरून कमी करणे, हे नवनिर्वाचित अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुढील पहिले आव्हान आहे.
आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा GDP’च्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असताना निर्यात वाढवून विदेश व्यापार तोटा कमी करणे हे सीतारामन यांच्यापुढील दुसरे मोठे आव्हान आहे. विदेश व्यापार तोटा परकीय चलनाच्या गंगाजलीपेक्षा (तब्बल २८.९१ लाख रुपये) खूपच कमी आहे, ही एक समाधानाची बाब समजावी लागेल. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी २0१९ ला सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प २७ लाख कोटींचा होता. सीतारामन यांचा अर्थसंकल्प ३० ते ३२ लाख कोटी (महसूल व खर्चाचा) राहण्याची शक्यता आहे.
