मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. दरम्यान काही महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले होते. दरम्यान, आता देशातील सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॉम्ब वाटप करण्यात येणार असल्याचा दावा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळबळ उडवून दिली आहे.

‘देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप’ असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. त्यामुळे मागे कोणता राजकीय अर्थ काढायचा आणि मनसे नेमका कोणता राजकीज धमाका करणार याची उत्सुकता शिगेला पोहिचली आहे, बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी अभिजीत पानसेंशी संपर्क साधला. तेव्हा, ‘हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या’, असं ते म्हणाले.

नेमकी काय पोस्ट केली आहे अभिजित पानसे यांनी?

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले होते. ईव्हीएमवरील संशय, पुढील निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेणे व लोकसभा निवडणुकीचा निकाल या विषयांवर सोनिया गांधी यांच्याशी आपण चर्चा केली, असे राज ठाकरे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, ईव्हीएमबाबत मी जे मुद्दे मांडले, त्यांना सोनिया गांधी यांनी दुजोरा दिला. देशाला मोठ्या जन आंदोलनाची गरज असून, त्यासाठी विरोधी बाकांवरील सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असेही मी त्यांना सांगितले, असे नमूद करून राज म्हणाले की, शरद पवार यांच्याशीही ईव्हीएमसंदर्भातच आपली चर्चा झाली होती.

‘हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत, लवकरच तारीख समजेल, तेव्हा प्रत्यक्षच या’: अभिजित पानसे