मुंबई: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तावडेंच्या जागी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विनोद शेलार किंवा बोरिवलीचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रवीण शाह यांची नावे चर्चेत आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाने पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम व बोरिवली विधानसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मालाड पश्चिमेतून प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉ. श्याम अगरवाल व बोरिवलीतून विनोद शेलार यांना उमेदवारी मिळू शकते अशीदेखील चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत तसेच काल रात्री जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही यांचे नाव नव्हते. त्यामुळे तावडे यांचे काय होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात व मुंबईत सुरू आहे.
शिवसेना-भारतीय जनता पक्षा यांच्या युतीच्या घोषणेनंतर भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत १२५ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये पुण्यातील कोथरूडमधून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, कसबा पेठेतून मुक्ता टिळक, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तर पहिल्या यादीतून एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे, मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाची पहिली आणि दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या यादीत खडसे, तावडे आणि बावनकुळे यांच्या नावाचा समावेश असणार आहे की पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात येणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही यादीत एकनाथ खडसे यांचे नाव नसले तरी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज याआधीच दाखल केला आहे.
