मुंबई: विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भारतीय जनता पक्षाला स्वबळ तर दूरच, पण २०१४च्या निवडणुकीत होत्या, तेवढ्या जागा देखील जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत शिवसेना अधिक कठोर आणि अडून राहणं हे साहजिक आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करणं अशक्यच असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाव आता युतीमध्ये चांगलाच वधारला असून या लहान भावाचा हट्ट आता भारतीय जनता पक्षाला पुरवावाच लागेल अशी चिन्ह आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने आधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या दिलेल्या असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करून समाज माध्यमांवर नवी चर्चा सुरू करून दिली आहे. हे व्यंगचित्र रवि नावाच्या व्यंगचित्रकाराने काढलं असून त्याचं देखील कौतुक संजय राऊत या ट्वीटमध्ये करत आहेत.
काँग्रेसनं शिवसेनेला देऊ केलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला नामोहरम करण्यासाठी शिवसेना कुरघोडी करत आहे. समाज माध्यमांवरही व्यंगचित्र व्हायरल होत आहेत. अशाच प्रकारचं एक व्यंगचित्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टाकलं आहे. व्यंगचित्राची कमाल बुरा न मानो दिवाली आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे.
व्यंग चित्रकाराची कमाल!
बुरा न मानो दिवाली है.. pic.twitter.com/krj2QAnGmB— Sanjay Raut (@rautsanjay61) October 25, 2019
या व्यंगचित्रामध्ये वाघाच्या पंज्यात (हातात) कमळ असल्याचं दाखवण्यात आलं असून, गळ्यात राष्ट्रवादीचं घड्याळ पाहायला मिळतंय. म्हणजेच राष्ट्रवादीच्या मदतीनं भारतीय जनता पक्षावर कुरघोडी करण्याचा शिवसेनेनं प्रयत्न केला आहे. शिवसेना नेते संजय राऊतांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर शेअर केलं असून, ते वाऱ्यासारखं व्हायरल होत आहे.