नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली. त्यामुळं निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही दोषींची फेरविचार याचिका फेटाळून लावली. दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने मागील आठवड्यात दोषी अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) यांचं डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना २२ जानेवारीच्या सकाळी एकाच वेळी फाशी दिली जाईल.

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

 

Web Title:  Delhi Nirbhaya convicts curative petitions has been rejected by Supreme court of India.

निर्भयाच्या दोषींना फाशीच; सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली