मुंबई : “महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे”, असा घणाघात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली.
जाहिरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ. तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं असतं तर लोकांनी देखील आधी ठरवलं असतं की कोणाच्या बाजूने जायचं, असं खोत म्हणाले. दरम्यान, मी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की जे पक्ष जाहिरनाम्यात छापतात आणि निवडून आल्यावर त्याची आंमलबजावणी करत नाही अशा पक्षांची नोंदणाी रद्द केली पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तब्बल ७ लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड’मधील बैठकीत दिले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे २०१८ चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर ९० हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत २७ तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले.
Web Title: Rayat Party Chief Sadabhau Khot said Maharashtra government cheats farmers.
