मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.
दरम्यान, आज मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेते पदी निवड करण्याचा ठराव मांडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्याकडे पक्षातील निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल झाला आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यतील स्वतःच्या व्हिजन बद्दल देखील मंचावर बोलताना थोडक्यात मांडणी केली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांच्या आशीर्वादानं शिक्षण ठराव मी तुमच्यासमोर मांडतो आहे. परवडणारी आणि गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत शिक्षण ठराव मांडला आहे.
महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचं अनावरण झालं आहे आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
Web Title: Amit Thackeray appointed as a Nete in MNS.
