मुंबई : सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे. सामना अग्रलेखात म्हटले आहे की, अण्णांनी रामलीला मैदानावरील त्यांचे आंदोलन मागे घेतले असले तरी त्यातून साध्य काय झालं असा प्रश्न उपस्थित केला आहे. पूर्वीसारखा जोर त्यांच्या आंदोलनात आता दिसलाच नाही अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर करण्यात आली आहे.
अण्णांनी लोकपाल तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले खरे पण अण्णांच्या आंदोलनातून नक्की साध्य काय झालं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सातव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले म्हणजे नक्की काय झालं ? फडणवीसांनी अण्णांच्या विविध मागण्यांच पंतप्रधानांची सही असलेलं पत्र अण्णांना सुपूर्द केलं आणि अण्णांनी आंदोलनाची सांगता केली आणि बातमी आली की, केंद्र सरकारने सर्व मागण्या तत्वतः मान्य केल्या. आता तत्वतः म्हणजे नक्की काय ? पुन्हा अण्णा म्हणतात मागण्या सहा महिन्यात मान्य नाही झाल्या तर पुन्हां उपोषणाला बसेन. मुळात अण्णांच्या रामलीला मैदानावरील फलित काय ? तर फक्त अण्णांचं वजन सहा-सात किलोने घटले, पण आंदोलनातून काहीच हाती लागले नाही.
सरकारच्या तत्वतः आश्वासनांवर भरवसा ठेवायचा होता तर रामलीलावर कशाला, सरळ राळेगणसिद्धीतच आंदोलन करायला काहीच हरकत नव्हती. अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
