नवी दिल्ली : मोदीसरकार मधील कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी धक्कादायक विधान केल्याने भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. ‘भारतासारख्या मोठ्या देशात असे एक-दोन बलात्कार होत असतात’, असं वादग्रस्त विधान त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी अशी मुक्ताफळं उधळताना जरा सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही.
उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणानंतर आधीच भाजपची प्रतिमा मलिन झाली असताना दुसरीकडे मोदी सरकारमधील मंत्रीच अशी मुक्ताफळं उडवत आहेत. देशभरातून बलात्कारावर कठोर कायदे लागू करावेत म्ह्णून सरकार प्रयत्नं करत असताना भाजप सरकारचे कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी अशी विवादित वक्तव्य करून पक्षाला अजून अडचणीत आणत आहेत.
भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होत राहतात, ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे असं वक्तव्य करून सरकार किती संवेदनशील आहे हे ही उघड होतं. संतोष गंगवार यांच्या विधानाने सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध आणि राग व्यक्त केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा तसेच त्यांच्यावरील अत्याचाराचा प्रश्न इतका गंभीर झाला असताना संतोष गंगवार यांचे वक्तव्य भाजपच्या अडचणी वाढवणार हे नक्की आहे.
