कैरना : उत्तर प्रदेशातील कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला धोबीपछाड करत आरएलडीने विजय संपादित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चांगलाच धक्का दिला आहे. आधीच गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीतील पराभवानंतर योगी आदित्यनाथ आणि भाजपवर प्रचंड दबाव होता. अखेर २०१९ मधील निवडणुकीपूर्वी भाजपला अजून एक जोरदार धक्का उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत बसला आहे.
कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत आरएलडीचे उमेदवार तबस्सुम हसन यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यामध्येच तबस्सूम हसन यांनी 35 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. भाजपा खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे कैराना लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील नूरपुर विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीचे उमदेवार नईम ऊल हसन यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे.
०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. परंतु गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीत पराभवानंतर भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर त्यांना पुन्हां पराभवाचा धक्का बसल्याने २०१९ चा सत्ता स्थापनेचा मार्ग कठीण होताना दिसत आहे.
