मुंबई : शिवसेनेने नुकतीच शरद पवारांच्या पगडी राजकारणावर सडकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्नं केला आहे. शिवसेनेला प्रश्न करताना नवाब मलिक म्हणाले की, महात्मा फुलेंची पगडी म्हणजे समाजातील सामाजिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा विचार आणि समतावादी विचारधारेच प्रतीक असल्याने त्याला शिवसेनेने विरोध करण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जर शिवसेनेचा महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध असेल तर तसं शिवसेनेने जाहीर करावं असं नवाब मलिक म्हणाले. मागील काही दिवसांपासून या विषयावर केवळ राजकारण सुरु असून शरद पवार यांनीच समतावादी विचारधारेच प्रतीक असल्याने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीचा वापर करा, असे पक्षाला सुचवले होते असं मलिक म्हणाले.
समाजात ओबीसी आणि मागासवर्गीय समाज अशा सर्वच थरातील लोकांना ऊर्जा मिळाली पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका असून ती शिवसेनेला मान्य नाही, असा सणसणीत टोलाही नवाब मलिक यांनी शिवसेनेला लगावला आहे.
शिवसेनेचा मंडल आणि महिला आरक्षणाला विरोध होता असं सुद्धा नवाब मलिक यांनी आवर्जून सांगितलं.
