कानपुर : नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. कानपूरमध्ये सीबीआयने तीन ठिकाणी छापेमारी केली आहे.

सरकारी बँकांनी केलेल्या तक्रारीनंतर रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी देशाबाहेर फरार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. परंतु काल रविवारीच विक्रम कोठारी एका लग्न समारंभाला उपस्थित होता असे ही समजते आणि त्या कार्यक्रमाला अनेक उद्योगपतींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सुध्दा उपस्थित असल्याचे कळते.

विक्रम कोठारी हा कानपूरमध्ये मध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो. त्यांचा पनकी दादानगर येथे कारखाना असून तो सध्या बंद आहे. एवढेच नाही तर त्याचं कानपुर माल रोडवरील कार्यालय सुध्दा बंद आहे. विक्रम कोठारीने अनेक सरकारी बँकांकडून जवळजवळ ८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

त्याने युनियन बँकेकडून घेतलेले ४८५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी युनियन बँक विक्रम कोठारीने गहाण ठेवलेली संपत्ती विकून रक्कम वसूल करणार आहे असे बँकेच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांना कळवले आहे. तसेच अलाहाबाद बँकेकडून घेतलेल्या ३५२ कोटी रुपयांची वसुली बँक विक्रम कोठारीची तारण ठेवलेली जमीन विकून पैसे वसूल करणार आहेत.

Rotomac 800 crore loan scam CBI registered case against company