पुलवामा : कालच्या भीषण हल्ल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यानंतर देखील हल्ला यशस्वी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अॅलर्ट नुसार, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले. त्याच दिवशी हल्ल्याचा महाभयंकर कट, दहशदवाद्यांनी रचला आहे. त्यानुसार हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिले होते.
पुलवामा जिल्ह्यात ज्या ताफ्यातील वाहनाला दहशदवाद्यांनी लक्ष केले, त्यात एकूण ७८ वाहने होती. त्यातून २५४७ CRPF चे जवान प्रवास करत होते. दरम्यान, या ताफ्याच्या मार्गावर जागोजागी सुरक्षा देखील तैनात होती. असं असताना देखील हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. अनेकदा अशा ताफ्यातून एकावेळी जास्तीत जास्त १००० जवानांची ने-आण केली जाते. मात्र जोरदार बर्फवृष्टी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे गेले ४ दिवस हा राजमार्ग बंद राहिल्याने तो सुरु होताच नेहमीपेक्षा अधिक वाहन आणि जवान धाडण्याचे ठरले.
सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यात ७८ वाहने होतीे. त्यात २,५४७ जवान होते. त्यातील बहुतांश जवान हे सुट्टीवरून ड्युटीवर रुजू होण्यासाठी निघाले होते. ज्या वाहनावर दहशदवाद्यांकडून हल्ला झाला ते CRPFच्या ७८ व्या बटालियनचे होते आणि त्यात एकूण ३९ जवान स्वार होते. दरम्यान, ताफा दुपारी ३.३० वाजता चिलखती गाड्यांच्या बंदोबस्तात जम्मूहून रवाना झाला व दिवस मावळेपर्यंत तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. पण वाटेतच अवंतीपोराजवळील लाटूमोड गावाजवळ हा हल्ला झाला. आयईडी स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसचा पाठलाग केला. नंतर कारने बसला धडक दिली आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		