अहमदाबाद : काही दिवसांपासून गुजरातमधील यूपी-बिहारींवर जोरदार हल्ले सुरु झाले होते आणि त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि विषय सर्वत्र पसरला. परंतु, आता परिस्थती निवळण्यास सुरुवात होताच राजकारण सुद्धा डोकं वर काढू लागलं आहे. या प्रकाराला सुरुवातीला भाजप शासनाला कारणीभूत ठरविण्यात आले होते, परंतु आता विषय काँग्रेसच्या अंगलट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कारण काँग्रेसचे आमदार आणि ठाकोर सेनेचे प्रमुख अल्पेश ठाकोर यांचा द्वेष पसरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर आमदार अल्पेश ठाकोर यांनी सुद्धा सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. मी जर एखाद्याला धमकी दिली असेल, तर मी स्वत: तुरुंगात जाईन, असं अल्पेश ठाकोर यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय आपण ११ ऑक्टोबरपासून उपोषण करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलं आहे. सध्या अल्पेश ठाकोर यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओनुसार ठाकोर यांनी द्वेष पसरवणारी भाषा वापरली आहे असं समोर येत आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस सुद्धा वादात सापडली आहे.
काही दिवसांपूर्वी एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बिहारच्या व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना गुजरातमध्ये घडली. त्यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हजारो उत्तर भारतीयांनी २-३ दिवसात गुजरात सोडलं आहे. यावरुन आता काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर वादात सापडले आहेत. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना यांचा हात असल्याचा आरोप होत आहे.भाजप सरकारने सुद्धा स्वतःची कातडी वाचविण्यासाठी आता अल्पेश ठाकोर यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.
