नवी दिल्ली: संसदेमध्ये आज घसरत चाललेल्या जीडीपीच्या मुद्यावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुक्ताफळे उधळली. जीडीपीचा जास्त उपयोग होणार नाही असे विधान त्यांनी केले. “जीडीपी १९३४ साली आला. त्याआधी जीडीपी वैगेर काही नव्हता. फक्त जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत मानून काहीही साध्य होणार नाही. भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही” असे निशिकांत दुबे म्हणाले.

निशिकांत दुबे हे भारतीय जनता पक्षाचे (BJP MP Nishikant Dubey) झारखंडमधील गोड्डा येथील खासदार आहेत. लोकसभेत कार्पोरेट टॅक्सवर (Corporate Tax Discussion in Parliament) चर्चा सुरू होती. त्यावेळी घसरत्या जीडीपीवर विरोधी बाकांवरील सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावेळी या चर्चेत भाग घेताना दुबे यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. जीडीपी १९३४मध्ये आला. त्यापूर्वी जीडीपी हा प्रकार नव्हता. जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत (GDP is not Bible, Ramayana or Mahabharata) नाही. त्यामुळे जीडीपीला सत्य मानून चालणार नाही आणि भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही, असं सांगतानाच सर्व सामान्य लोकांचा आर्थिक विकास होत आहे की नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे.

देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा ४.५ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ०.५ टक्क्यांची घरण झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच दर २.६ टकक्यांनी घसरला आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यातच उद्योगपती बजाज यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Industrialist Rahul Bajaj on Union Home Minister Amit Shah ) यांच्या उपस्थितीत उद्योगपती खरे बोलायला घाबरत असल्याचे वक्तव्य़ केले होते. यावरून मंदीच्या खाईत असलेल्या उद्योगक्षेत्रातील खदखद यावेळी व्यक्त झाली होती.

जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही: भाजप खा. निशिकांत दुबे