हैदराबाद: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
चारही आरोपी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. ४ डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली.
दरम्यान, माझ्या मुलीचा मृत्यू होऊन १० दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशा शब्दात प्रतिक्रिया देत त्यांनी या एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे. तर, हे आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले हे ऐकून मला अतिशय आनंद झाल्याचे बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या बहिणीने म्हटले आहे.
हे चार आरोपी अशा प्रकारे एन्काउंटरमध्ये ठार झाल्याने हे एक उदाहरण म्हणून कायम राहील. अतिशय रेकॉर्ड वेळेत आम्हाला न्याय मिळाला आहे, असे म्हणत या बहिणीने त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. चार आरोपींच्या एन्काउंटरनंतर दिल्लीतील सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली निर्भया हिच्या आईने हैदराबाद पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. यापेक्षा मोठा न्याय कोणताही असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
