नवी दिल्ली: राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार असलयाचे वृत्त आहे. सदर प्रकरणाची जलद गतीने सुनावणी घेण्याची मागणी हिंदू पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी एका जनहित याचिकेच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, राम जन्मभूमी प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी सुप्रीम कोरेटने स्थापन केलेल्या समितीच्या कामात समाधानकारक प्रगती पाहायला मिळत नसल्याचं विशारद यांनी संबंधित याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी जलद सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी ८ मार्च २०१९ रोजी एक त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ते श्रीराम पंचू सदस्य आहेत. १५ ऑगस्टपर्यंत सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना समितीला कोर्टाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु या समितीच्या कामात समाधानकारक प्रगती न झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात जलद गतीनं सुनावणी होण्याची गरज असल्याचं याचिका कर्त्यांनी नमूद केले आहे.
सीजेवाय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून याचिकेवर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात जस्टीस एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या कामाच्या गतीबद्दल नाराजी व्यक्त करणारे विशारद अयोध्या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत. त्यामुळे समितीकडून सुरू असलेले मध्यस्तीचे प्रयत्न थांबवून सदर प्रकरण जलद गतीनं मार्गी लागावे का, यावर आज सुप्रीम कोर्टात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
