वॉशींग्टन: आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISISचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी आज सकाळी “काही तरी खूप मोठं घडलंय” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यामुळे बगदादीच्या खात्याच्या शक्यतेबाबत जगभरात चर्चा सुरु होती. मात्र, आता याला खुद्द ट्रम्प यांनीच पुष्टी दिली आहे. सिरियामध्ये अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली.

दरम्यान, एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.

बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.

इराकमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर फोफावलेल्या ‘आयएस’ने सीरियातील यादवीचा फायदा घेत आपले बस्तान बसवले. त्यानंतर २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांमध्ये त्यांचा या दोन्ही देशांमधील मोठ्या प्रदेशावर ताबा होता. मात्र, आंतरराष्ट्रीय फौजांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांची पिछेहाट झाली आणि त्यांच्या ताब्यातून दोन्ही देश मुक्त झाले आहेत. मात्र, या काळामध्ये पश्चिम आशियातील देश, अफगाणिस्तान, आग्नेय आशियातील देश आणि आफ्रिकेमध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांचे अस्तित्व दिसून आले आहे. युरोपातही ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी अनेक हल्ले घडवून आणले आहेत. आंतरराष्ट्रीय फौजांनी इराक आणि सीरियातून ‘आयएस’ला हुसकावल्यानंतरही बगदादी त्यांच्या ताब्यामध्ये आला नव्हता. अमेरिकेने त्याच्या डोक्यावर २.५ कोटी डॉलरचे इनाम ठेवले होते.

आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा: डोनाल्ड ट्रम्प