मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील सर्वच पोल्समध्ये काँग्रेस-एनसीपी’चा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज समोर आल्यानंतर काँग्रेस आणि एनसीपीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एनसीपी’चे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी निवडणूक प्रचारावरून काँग्रेसच्या नेतृत्वाला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. ‘एनसीपी सोबत असताना शत्रूची गरज नाही. शरद पवार यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचा कोणता नेता राज्यभर फिरला? अखेर प्रकृती चांगली नसतानाही ८० वर्षांच्या शरद पवारांना राज्यभर फिरून सभा घ्याव्या लागल्या,’ असं म्हणत काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांनी एनसीपी’च्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. २४ ऑक्टोबरला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. पण निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेस-एनसीपीत घमासान सुरु झालं आहे. जर महाराष्ट्रात आघाडीचा पराभव झाला तर त्याला काँग्रेस जास्त जबाबदार असेल, असं एनसीपीचे नेते माजिद मेमन म्हणाले आहेत.
शरद पवारांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेसकडून नरमी दाखवण्यात आली. राहुल गांधींनी मुंबईत काही दौरे केले, पण काँग्रेस नेत्यांनी खास मेहनत केली नाही. जर आम्हाला यश मिळालं नाही, तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल,’ अशी प्रतिक्रिया माजिद मेमन यांनी दिली. ‘आकडे येतील, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. २४ तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. पण कुठे ना कुठे पराभवाची जबाबदारी आमचीही असेल. ईडीचा आपल्या फायद्यासाठी दुरुपयोग करणं चुकीचं आहे,’ असं वक्तव्य मेमन यांनी केलं.
