21 November 2019 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाऊ नये: सुशीलकुमार शिंदे

Former CM Sushilkumar Shinde, MLA Praniti Shinde, Congress, Shivsena

सोलापूर: काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळाला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात अपयश आलं तर त्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी असेल. त्यांनी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला व पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर निश्चितच त्याचा विचार करण्यात येईल. हा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. राज्यातील जनतेनं दिलेला कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावं, असं शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि एनसीपी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेना आणि एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं असल्याचं अनेक माध्यमांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. राऊत यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(301)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या