नाशिक: राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. शरद पवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.

पवार यांनी दवंगे या शेतकऱ्यांकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे.

नाशिक: पवारांकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांच्या भेटीगाठी