औरंगाबाद : ईव्हीएम मशीनवरील आक्षेपावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले आहे . २००४ ते २०१४ दहा वर्ष राज्यात पार्लमेंट ते पंचायत तुमची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडूण आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतांनाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेने ठरवला आहे असे फडणवीस यांनी ठणकावले. दरम्यान, ईव्हीएम बाबत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असाच केला होता हा योगायोग.

औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. तत्पुर्वी भव्य रोड शो काढण्यात आला. सभेला मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणी योजनेचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयात जे व्हायचे ते होईल, पण शहरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे म्हणून पाणी पुरवठ्याची एकत्रित योजना तयार करा, असे आदेश मी दिले होते. त्यानुसार १६०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे.

राज्य सरकार ही योजना मंजूर करेल. योजनेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद देखील करेल. औरंगाबाद शहराला पाणी आम्ही निश्चितपणे पाणी देऊ. औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान दिले आहे. यापैकी ७५ टक्के निधी खर्च झाल्याचे दाखवा, आणखी २०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

योगी आदित्यनाथांनंतर फडणवीसांचं विधान; ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मोदी’