मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पक्ष प्रचार गीत देखील प्रसिद्ध करत आहेत. त्यात भाजप सर्वात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यातील मतदाराला भावनिक साद घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतीची घौडदौड दाखवण्यासाठी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा विजय असो अशा आशयाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. त्यानंतर एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, सोमवारी रात्री ८. ४३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांच्या स्वतःचा कौतुकाचा पोवाडा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, विशेष बाब म्हणजे प्रचारासाठी तयार केलेल्या या व्हिडीओत आम्ही इस्लामपुरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर केला आहे असा आरोप एनसीपीकडून करण्यात आला आहे.

विषय एवढ्यावरच संपत नसून मुंबईतील अंधेरी-घाटकोपर मार्गावरील रिलायन्स मेट्रो दाखविण्यात आली असून, भाजपाच्या काळातील एकही मेट्रो अजून कार्यान्वित झालेली नाही. वास्तविक जी मेट्रो ट्रेन दाखविण्यात आली आहे ती देखील काँग्रेसच्या काळातील आहे हे समोर आलं आहे. त्यामुळे या पोवाड्यात भाजपकडे स्वतःच्या काळातील कर्तृत्व नक्की काय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील