मुंबई: बीडमधील एनसीपीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील स्वतः उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एनसीपीला मोठा राजकीय धक्का बसल्याच म्हटलं जात आहे.
मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले. परंतु, क्षीरसागर यांच्या भेटीमुळे मराठवाड्यातील बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे आमो तो देखील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर. जयदत्त क्षीरसागर यांनी कोणत्या पक्षात जाणार हे अजून जाहीर केलं नसलं तरी आजच्या भेटीने बरंच काही स्पष्ट झालं आहे. परंतु, त्यांचे पक्षांतर एनसीपीसाठी नुकसानदायक ठरू शकते.
जयदत्त क्षीरसागर यांच्या मुंबईतील मातोश्री भेटीवेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलींद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पक्षाविरोधात जाऊन बीडमधील युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचा संकल्प केल्यानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे.
