सांगली : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी पाण्यात उतरुन गेल्या ४ दिवसांपासून मदत न झालेल्या सांगली येथील पूरग्रस्त गावात पोहचले. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली हे त्यांनी एकप्रकारे सिद्ध केलं आहे. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच म्हणावे लागेल.

परंतु विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याने त्यांनी ट्विट करुन मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घरात बसण्यापेक्षा बाहेर पडावं. टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावं असा टोला लगावला आहे. भाजपा नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना काढलेल्या सेल्फीत हसून दाद दिल्याने टीकेचे धनी झाले आहेत. दरम्यान यानंतर गिरीश महाजन यांनी माहिती देत आपण स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन बचावकार्यात सहभाग घेतल्याची माहिती दिली आहे. बचावकार्यात सहभागी झाल्याचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन एनडीआरएफ जवानांसोबत पाण्यात उतरुन लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत.

त्यामुळे धनंजय मुंडे, जयंत पाटील, राज ठाकरे यांनी गिरीश महाजनांच्या या प्रकारावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून महाजन यांना खडे बोल सुनावले होते. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता.

कोल्हापूरमधील शोबाजीवरून नेटकऱ्यांनी झोडपताच महाजन सांगलीमध्ये पाण्यात उतरले