मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष यात्रा काढून पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. या यात्रेसोबतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं तसंच पक्षांतराचं सत्र देखील सुरू आहे.त्यातच आता विधानसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवात लोकशाहीच्या या उत्सवाला सुरूवात होणार असल्याचे वृत्त आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आचारसंहिता १५ सप्टेंबरला लागू झाली होती.मात्र पितृपंधरावडा असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरणे इच्छुकांनी टाळले होते. यावर्षी २९ सप्टेंबरला घट स्थापना होणार आहे. त्यामुळे या घट स्थापने आधीच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.आचारसंहितेचा कार्यक्रम हा ४५ दिवसांचा असतो. ती लागू झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आठवडाभराचा कालवधी दिला जातो. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवाच्या शुभ मुर्हूतावर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या तारखा देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील अखेरच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

सरकारच्या या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेटची बैठक घेतली. जाता जाता फडणवीस सरकारने एक-दोन नव्हे तर ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी त्यांच्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करणे, कुष्ठरोग पीडितांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणे, दिव्यांगासाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वॉटर ग्रीडला मंजुरी, बचतगटांना कुक्कुटपालनासाठी निधी आदी महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे.

१७ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता?