मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा इशारा देतानाच जागा वाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला दिला.

मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्विकारणार नाही, असं सांगत त्यांनी काँग्रेस-एनसीपी’ची सत्तेची ऑफरही धुडकावून लावली. राष्ट्रीय पक्षांचे डोळे जेव्हा बंद होतात, तेव्हा ही जनताच अंजन घालते. जागावाटपावेळी आम्ही तडजोड केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला होता. विधानसभा जागावाटपाचाही १४४-१४४ ठरला होता.

विधानसभेच्या वेळी चंद्रकांतदादांनी काही अडचणी सांगितल्या होत्या, पण भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. पण मलाही पक्ष चालवायचा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला एक प्रकारचा इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

मला सत्तेची हाव नाही; पण सत्तेत समसमान वाटा हवा: उद्धव ठाकरे