मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
लोकसभा जाहीर झाली आणि हातकणंगले येथील माने कुटुंबीयांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. परंतु, आज धैर्यशील माने यांना शिवसेनेकडून अधिकृतपणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाच मुद्दा जोरदारपणे उचलला जाऊन, धैर्यशील माने हे शिवसेनेचे ‘प्रति निरव मोदी’ म्हणून विरोधक रान उठवण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने अधिकृतपणे दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन धैर्यशील माने आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्याशी संबंधित ‘पार्टनर मेसर्स महालक्ष्मी टेक्सटाईल’ या कंपनीचे नाव नमूद करून त्यांना कर्जबुडवे म्हणून घोषित केलं होत. त्यामुळे हे प्रकरण प्रचारादरम्यान शिवसेनेवर शेकण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		