
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये आज अफाट विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांनी मजबूत झाले होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक विक्री केली आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 10.82 टक्के घसरणीसह 1,173 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाटा सन्स कंपनीला 2025 पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याबाबत कळवले होते. टाटा सन्स कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा सन्स कंपनीनेही रिझर्व्ह बँकेकडे एक विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र लिस्टिंग टाळण्याची ही विनंती रिझर्व्ह बँकेने फेटळली.
आता टाटा सन्स कंपनी आपली लिस्टिंग टाळण्यासाठी बॅलन्स शीटची पुनर्रचना करण्याचा पर्याय तपासत आहे. जर टाटा सन्स कंपनीने संपूर्ण कर्जाची परतफेड करून कर्जाची पुनर्रचना केली, तर टाटा कॅपिटल कंपनीमधील तिची होल्डिंग दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करून NBFC म्हणून टाटा सन्स कंपनीची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. टाटा सन्सला फक्त आपली होल्डिंग दुसऱ्या कंपनीमध्ये हस्तांतरित करायची आहे, जेणे करून त्यांना एनबीएफसी गटातून बाहेर ठेवले जाईल.
मागील एका आठवड्यात ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा कंपनीचे शेअर्स 33 टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 28 टक्के, रेल्वे इंडिया कमोजीचे शेअर्स 14 टक्के, आणि टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 13 टक्के मजबूत झाले होते. टाटा सन्स कंपनीच्या आयपीओबाबत टाटा समूहाने अद्याप अधिकृत घोषणा केली नाहीये. मात्र मागील आठवड्यापासून अनेक गुंतवणूकदारांनी टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.