नागपूर : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेलं असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
नागपूर मधील उत्तर भारतीय समाजाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अकलेचे तारे तोडले. उत्तर भारतीय लोकच मुंबई शहर चालवतात. आपल्या उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास संपूर्ण मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थितांना संबोधित करताना केलं. नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे विवादित विधान केलं असून, त्यांच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना निरुपम म्हणाले की, उत्तर भारतीय माणूसच संपूर्ण मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय समाजाचा माणूस करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा, त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो, फळं-भाजी विकतो, बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि हीच माणसं संपूर्ण मुंबई चालवतात. तुम्ही त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवलं तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकते, पण तसं करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरुपम यांनी दिला.
तसेच गुजरातमधील उत्तर भारतीयांविरोधात होत असलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी मोदींना आणि गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. निरुपम त्याच भाषणात म्हणाले की, गुजरातमध्ये सुद्धा उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. आज पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. एक दिवस मोदींना सुद्धा वाराणसीला जायचे आहे, अशी अप्रत्यक्ष धमकी सुद्धा निरुपमांनी मोदींना दिली आहे.
