मुंबई: अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू पुढे सरसावले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी त्यांनी मोर्चा काढला. राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने परिसराला पोलीस छावणीचं रुप आलं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्याने तसंत कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यासंबंधी बोलताना बच्चू कडू यांनी आपण पाच लोक घेऊन मंत्रालयात चाललो होतो, पण पोलिसांनी त्यासाठीही नकार दिला. सरकार नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पाच दिवसांत निर्णय दिला नाही तर न सांगता राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.

ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून आ. बच्चू कडू यांचा राजभवनावर शेतकरी मोर्चा