मुंबई: निवडणुकीच्या राजकारणात उतरलेली ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणून सध्या चर्चेत असलेले व शिवसेनेकडून ‘सूर्ययान’ असं कौतुक झालेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाव न घेता जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘बाबा मी धावण्याच्या शर्यतीत पहिला आलो,’ हा विनोद ट्विट करून दमानिया यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य निवडणूक लढतीवर भाष्य केलं आहे.

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच बिग बॅास फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकलेवरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. तसेच राज ठाकरे पुतण्या विरोधात उमेदवार न दिल्याने आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघातून विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. मात्र यावर सामाजिक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरेंना टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

‘एक मुलगा आपल्या बाबांना शर्यतीत पहिला आल्याचं सांगतो. बाबा त्याला विचारतात, दुसरा आणि तिसरा कोणा आला? त्यावर कोणी नाही. मी एकटाच धावत होतो, असं मुलगा त्यांना सांगतो,’ असा खरंतर हा विनोद आहे. मात्र, दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढं ‘वरळी मतदारसंघात…’ असं ट्विट करून अंजली दमानिया यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

बाबा मी शर्यतीत पहिला आलो; अंजली दमानियांकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली